महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साडेदहा वर्षांपूर्वी नांदेड जिल्हयातील बोळसा ता. उमरी येथे मारहाण करणाऱ्या दोघांना एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.

४ फेब्रुवारी २०१२ रोजी महावितरणच्या नांदेड मंडळांतर्गत येणाऱ्या उमरी तालुक्यातील बोळसा येथे देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ श्री पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. याप्रसंगी डीपी मध्ये फ्युज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे त्या ठिकाणी आले आणि तंत्रज्ञ पांडुरंग दत्तराव मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पांडूरंग मोरे यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली त्यावरून गुन्हा क्रमांक ६/२०१२ दाखल झाला होता. पुढे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.

न्यायालयात या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्या. खरादी यांनी राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ आणि सह कलम ३४ अन्वये एक वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी हजार रुपये रोख दंड तसेच कलम ३३२ आणि सह कलम ३४ नुसार सहा महिने साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा त्यांना एकत्रीत भोगावयाच्या आहेत. त्याचबरोबर दंडाची रक्कम पिडीत कर्मचारी श्री पांडूरंग मोरे यांना कलम ३५७ अन्वये अपील कालावधी संपल्यानंतर सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ॲड एस.टी. लाठकर तसेच ॲड रणजित देशमुख यांनी मांडली. याकामी महावितरणचे कनिष्ठ विधी अधिकारी ॲड इम्रान शेख यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content