मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना कोणत्याही प्रकारचा सर्व्हीस चार्ज आकारता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे हॉटेलच्या बिलावर कुठल्याही प्रकारे सेवाशुल्काचा भुर्दंड लादता येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्व्हीस टॅक्सची आकारणी करण्यात येते. मात्र ही आकारणी चुकीची असल्याचा निर्वाण देण्यात आला आहे. ग्राहकांकडून सेवाशुल्क वसूल करणार्या हॉटेल, रेस्तरॉंना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने मोठा दणका दिला आहे. ग्राहकांनी स्वेच्छेने टिप दिली तर ती अवश्य घ्या, पण सेवाशुल्क बिल्कूल घेता येणार नाही. हॉटेलच्या बिलावर कुठल्याही प्रकारे सेवाशुल्काचा भुर्दंड लादता येणार नाही, असे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल आणि रेस्तरॉंचालकांना दिले आहेत.
या अनुषंगाने, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल आणि रेस्तरॉंसाठी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार सेवाशुल्क वसुलीवर सक्त बंदी घालण्यात आली आहे. सेवाशुल्क आकारणी ही एक चुकीची व्यापारी प्रथा आहे. यापूर्वी सरकारने सेवाशुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही हॉटेल-रेस्तरॉं बिलामधून सेवाशुल्काची वसुली करीत आहेत. हॉटेलचालक हे शुल्क बिलामध्ये जोडू शकत नाही. तसेच इतर कुठल्या नावानेही त्यांना या शुल्काची वसुली करता येणार नाही, असे प्राधिकरणाने बजावले आहे. यात खालील प्रमाणे नियमावली जारी करण्यात आलेली आहे.
या मार्गदर्शक तत्वांच्या नुसार- हॉटेलमधील चांगल्या सेवेनंतर ‘टिप’ द्यायची की नाही? हा ग्राहकाच्या मर्जीचा विषय असेल. ग्राहकांनी स्वेच्छेने ‘टिप’ दिली तर अवश्य घ्या. मात्र सेवाशुल्कसाठी सक्ती करणे बेकायदेशीर आहे. ग्राहक सेवाशुल्क घेणाऱया हॉटेल वा रेस्तरॉंविरुद्ध १९१५ वर कॉल करून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर तक्रार करू शकतो. तसेच ग्राहक आयोगाकडेही दाद मागू शकतो. नियमांचे उल्लंघन करून जर हॉटेलच्या बिलात सेवाशुल्क जोडले असेल तर ग्राहक ते शुल्क वगळून नव्याने बिल देण्याची मागणी करू शकतो.