राज्यात अस्थिरता पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न-थोरात

मुंबई प्रतिनिधी । कोरोना सारख्या आपत्तीत भाजप राजकारण करत असून दिल्लीतील सत्ताधार्‍यांच्या मदतीने राज्यात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे, असे आरोप सरकारवर केले आहेत. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावाही थोरात यांनी केला. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही असून महाराष्ट्र बचाव नव्हे तर भाजप बचाव अशी असल्याचा आरोप देखील ना. थोरात यांनी केला.

Protected Content