जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रान्सजेंडर यांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली आहे, त्याच प्रमाणे त्यांना मुलभूत सोयी – सवलती देण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी जनजागृती करत असल्याचे प्रतिपादन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅन्ड एम्पावरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑक्टोंबर २०२४ रोजी ‘ट्रान्सजेंडर आणि प्रशासनाची भूमिका’ या विषयावर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळा सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलसचिव डॉ. पाटील बोलत होते.
यावेळी विचारपीठावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनिल पाटील , जि. प.चे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर उपस्थित होते.
डॉ. विनोद पाटील म्हणाले की, ट्रान्सजेंडर हे स्वत:हून आपली ओळख द्यावयास लागले असल्याने त्यांची संख्या लक्षात यायला लागली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रशासन त्यांच्या हक्कांसंदर्भात जाणीव जागृतीपर विविध योजना राबवून समाजात त्यांना समानतेची संधी देण्याचा प्रयत्न करीत आहे.
ट्रान्सजेंडर ला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक :
कायद्यामुळे ट्रान्सजेंडरला समानतेची संधी मिळाली असून त्यांना समानतेची वागणूक मिळावी आणि त्यांना देखील हक्काची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या वतीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील म्हणाले की, ट्रान्सजेंडर यांनी उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली असून विद्यापीठानेही त्यास प्राथमिकता दिली आहे. मात्र शालेय शिक्षणापासूनच अनेक ट्रान्सजेंडर हे वंचित राहतात फारच थोडेजण उच्च शिक्षण घेतात ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात प्रबोधन होणे आवश्यक असून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमातच प्रबोधनाच्या संदर्भात याचा समावेश होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी संवाद गट, पथनाट्य, आरोग्य शिबिरे आदी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. ट्रान्सजेंडर यांचे प्रती संवेदनशिलता येणे आवश्यक असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी देणेही तितकेच आवश्यक आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी पावरपॉईट प्रेझेंटेशनद्वारे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. शासनाचा सामाजिक न्याय विभाग ट्रान्सजेंडरसाठी विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे प्रबोधन होऊन आता विविध क्षेत्रात ट्रान्सजेंडर यांना स्थान मिळत असून आहे शासकीय नोकरीसह राजकीय क्षेत्रापर्यंत भरारी घेत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ट्रान्सजेंडरचा सविस्तर इतिहास उलगडला. यावेळी ते म्हणाले की तृतियपंथी यांना खरी ओळख सरकारने केलेल्या कायद्याने करुन दिली आहे. तसेच त्यांच्या विकासासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासंदर्भात समाजातील सर्व स्तरातील घटाकांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तसेच शिक्षित लोकांकडूनच तृतियपंथीयांचा विरोध होत असल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जि.प.चे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे यांनी ट्रान्सजेंडर समुदायाची समाजात अवेहलना होत असून आता समाजाचा दृष्टीकोन बदलणे महत्वाचे आहे. शासनाने केलेल्या कायद्याने ट्रान्सजेंडरला संरक्षण मिळत असून हा कायदा म्हणजे त्यांचेसाठी संजीवनी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कला व मानव्य विद्या प्रशाळेचे संचालक डॉ. राम भावसार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी त्यांनी ट्रान्सजेंडरची परिस्थिती विदारक असल्याचे सांगून त्यांच्या बाबत समग्र असा सकारात्मक दृष्टीकोन तयार होणे आजच्या काळाची गरज आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुप्रसिद्ध उद्योगपती पदम्विभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. प्रास्ताविकात माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी कार्यशाळेच्या आयोजना संदर्भात भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. गोपी सोरडे, अॅङ सूर्यकांत देशमुख यांनी केले. आभार सोनाली कमोदे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, मंगेश बाविसाने, पंकज शिंपी, धनंजय देशमुख, भूषण अंबोळकर, अमोल पाटील, तुलसी सुशीर, भाग्यश्री मानकर, सुजाता अडकमोल, गौरव रुले, वैभव भोंबे यांनी परिश्रम घेतले.