मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार – खा. ए.टी. पाटील


पारोळा (प्रतिनिधी) मतदार संघातील विकास कामांसह संसदेतील माझ्या कामाचा अहवाल चांगला होता.तरी देखील माझी उमेदवारी कापण्यात आली. हा एकप्रकारे माझ्यावर अन्याय असून मंगळवारी (दि.२६ ) रोजी कार्यकर्ता मेळाव्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तिकीट कापल्यानंतर प्रथमच त्यांनी समोर येत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यासाठी रविवारी पारोळा येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

या वेळी बोलताना ते म्हणाले की, उमेदवारी नाकारून पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. उमेदवारी का नाकारली? या बाबत मात्र पक्षाने कोणतेही कारण सांगितले नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. २६ रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला असून त्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले. इतकेच नव्हे तर या बाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पुढील भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता या मेळाव्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.

 

दरम्यान, पक्षाने उमेदवारी दिलेल्या स्मिता वाघ या आपल्या घरी आल्या होत्या व त्यांनी सहकार्य करण्याबाबत चर्चा केली, अशीही माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषेदेस ए.टी. पाटील यांच्यासह माजी आमदार डॉ.बी. एस. पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल मोरे, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, जिल्हा कोषाअध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content