दुबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांगलादेशातील राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता यावर्षीचा महिला टी-20 विश्वचषक बांगलादेशातून हलवण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार होता. मात्र बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे हा विश्वचषक यूएईत आयोजित केला जाईल. अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी केली आहे.
या स्पर्धेचे सामने ३ ऑक्टोबरपासून दुबई इंटरनॅशनल आणि यूएईच्या शारजाहच्या मैदानावर होणार आहेत. श्रीलंका आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानेही ही स्पर्धा आपापल्या देशांमध्ये आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले होते, परंतु परिषदेने हा सामना यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या विश्वचषकात 10 संघ सहभागी होणार आहेत. 18 दिवसांत 23 सामने होणार आहेत. भारत अ गटात ६ वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियासोबत आहे. या व्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि क्वालिफायर संघाचा समावेश आहे. तर यजमान बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि क्वालिफायर-2 संघ ब गटात आहेत.