
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ वाजेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, दिवसभर क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

समाजातील युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणे आणि समाजबांधवांमध्ये एकोपा वाढविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३१ सामने खेळविले जाणार असून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांतील संघांनी सहभाग नोंदविला आहे. भुसावळ, जळगाव, यावल, साकळी, चुंचाळे, पुणे, मुंबई, यवतमाळ, रिंगणगाव, बऱ्हाणपूर (म.प्र.) आणि सुरत (गुजरात) यांसह १६ शहरांतील संघ मैदानात उतरून विजेतेपदासाठी संघर्ष करणार आहेत.
दिवसभर रंगणाऱ्या या क्रिकेट महोत्सवाचा समारोप रात्री ८ वाजता बक्षीस वितरण समारंभाने होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र येत असल्याने भुसावळ व परिसरातील समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी अध्यक्ष किशोर गजानन नेवे, उपाध्यक्ष दिपक हरिभाऊ नेवे, सचिव राम सुधाकर माहूरकर तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा विनीता सुनिल नेवे, उपाध्यक्षा अंजली प्रशांत नेवे आणि सचिव पुजा उदय नेवे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.



