
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आसाममधील गुवाहाटी येथे पार पडलेल्या १९ व्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत वरणगावच्या श्री हनुमान व्यायाम शाळेचा खेळाडू प्रणय संजय बावस्कर याने उल्लेखनीय कामगिरी करत ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. ६६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत त्याने वरणगावच्या क्रीडा इतिहासात प्रथमच राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेत पदक मिळविण्याचा मान मिळविला आहे.

दि. २९ मे ते ३१ मे दरम्यान आसाम राज्यातील गुवाहाटी येथील दिसपूरमधील भुगेश्वरी फुकोनानी इनडोअर स्टेडियममध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. ग्रॅपलिंग हा खेळ ‘गी’ आणि ‘नो-गी’ या प्रकारांमध्ये खेळला जात असून तो मल्लयुद्धाशी साधर्म्य असलेला अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ मानला जातो. देशभरातील २४ राज्यांमधून तब्बल ५६७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
महाराष्ट्र संघासोबत नाशिक विभागाचे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणय बावस्कर स्पर्धेसाठी रवाना झाला होता. राष्ट्रीय स्तरावरील कडव्या स्पर्धेत त्याने दमदार खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळविला आणि ब्राँझ पदकावर नाव कोरले. या गटात अरुणाचल प्रदेशच्या मार्टिन रोमिंग यांनी सुवर्णपदक पटकावले, तर केरळच्या आदित्य केशव यांनी रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणय बावस्करने तिसरा क्रमांक मिळवत वरणगावसाठी ऐतिहासिक यश संपादन केले. या कामगिरीमुळे वरणगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेनंतर प्रणयच्या वरणगाव आगमनावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकापासून श्री हनुमान व्यायाम शाळेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. नागरिक, क्रीडाप्रेमी आणि व्यायामशाळेच्या सदस्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. प्रणयच्या यशामागे वस्ताद नामदेव मोरे, टीम कोच संजय बावस्कर आणि दिलीप संगेले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच चंद्रकांत बढे सर, श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनील काळे, बाळासाहेब चव्हाण, प्रा. भागवत निकम, संजय तायडे, महेंद्र इंगळे, किरण साळवे, एकनाथ भोई, दिनेश देशमुख, संजय चौधरी, उत्तम भोई, संदीप धनगर, दिलीप मराठे, प्रशांत निकम, राज निकम, नरेंद्र भोई, रमेश निकम, रमेश मराठे, श्रीराम भोई, भैय्या सोनवणे, शेख इस्माईल, महेश सोनवणे, सुनील बापू देशमुख यांच्यासह तालुका समिती सदस्य आणि व्यायाम शाळेच्या संचालकांनी त्याचा सत्कार केला.



