
बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या ई-फायलिंग प्रणालीची दखल घेत जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून बोदवडचा हा आदर्श पॅटर्न संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविण्याची ग्वाही दिली आहे. न्यायालयीन सेवा अधिक गतिमान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी नुकतीच बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी न्यायालयीन कामकाजाची पाहणी करत वकील संघाच्या कक्षाला भेट दिली. वकील बांधवांशी थेट संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी, समस्या आणि न्यायालयीन प्रक्रियेतील विविध बाबी जाणून घेतल्या. भेटीदरम्यान बोदवड न्यायालयातील ई-फायलिंग आणि डिजिटल कोर्ट व्यवस्थेची माहिती देण्यात आली. न्यायालयातील बहुतांश प्रकरणे ई-फायलिंग प्रणालीद्वारे दाखल केली जात असून व्हिडिओ शपथ आणि ई-फायलिंगच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवोदित वकिलांचे वकिलीपत्रही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने दाखल केले जात असल्याचे पाहून जिल्हा न्यायाधीशांनी समाधान व्यक्त केले. “बोदवडसारख्या तालुका स्तरावरील न्यायालयात ई-फायलिंगची प्रभावी अंमलबजावणी शक्य होत असेल, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातही ती यशस्वीपणे राबविता येऊ शकते,” असे मत व्यक्त करत त्यांनी या प्रणालीचा विस्तार करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा न्यायाधीशांनी नवोदित वकिलांशी संवाद साधत न्यायव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, कायद्यावरील अद्ययावत ज्ञान आणि नियमित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. वकिलांसाठी अभ्यासवर्ग, कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करण्यासाठी आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. बोदवड वकील संघाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘लीगल एड’ अर्थात मोफत कायदेशीर मदत उपक्रमाचीही त्यांनी विशेष दखल घेतली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी वकील संघाने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना करताना लीगल एड संदर्भातील विविध उपक्रम, न्यायालयीन कामकाजातील अडचणी, वकील आणि पक्षकारांच्या समस्या तसेच न्यायालयीन प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. धनराज प्रजापती यांनी केले. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी, बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. खुल्लम, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, उपाध्यक्ष ॲड. धनराज प्रजापती यांच्यासह ॲड. किशोर महाजन, ॲड. ईश्वर पाटील, ॲड. योगेश राजपूत, ॲड. के. एस. इंगळे, ॲड. सी. के. पाटील, ॲड. समीर पिंजारी, ॲड. अमोल पाटील, ॲड. शारदा राऊत तसेच परिसरातील वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



