शिलाई मशीनच्या पैशांवरून महिलेला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उधारीवर विकलेल्या शिलाई मशीनचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत, दगडफेक करून गंभीर दुखापत केल्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २० जून रोजी रात्री ११ वाजता लक्ष्मी नगर येथे घडली. या प्रकरणी २१ जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील रहिवासी पौर्णिमा अशोक गरुड (वय ३०) यांनी उधारीवर शिलाई मशीन विकले होते. या मशीनचे पैसे मागितल्याच्या रागातून राजनंदिनी सोनवणे, चेतना विजय अहिरे, सखुबाई सोनवणे आणि प्रशांत सोनवणे (सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव) यांनी पौर्णिमा गरुड यांच्या घरी येऊन त्यांना, त्यांच्या पाहुण्यांना आणि बहिणीच्या मुलीला शिवीगाळ केली. तसेच, जीवेठार मारण्याची धमकी देत त्यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत पौर्णिमा गरुड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर पौर्णिमा गरुड यांनी २१ जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संशयित आरोपी राजनंदिनी सोनवणे, चेतना विजय अहिरे, सखुबाई सोनवणे आणि प्रशांत सोनवणे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करत आहेत.