जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अखिल भारतीय मराठी बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखेतर्फे बालवारकऱ्यांची दिंडी, संत वेशभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा अनुभव घेत संतांच्या विचारांचे जतन करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संतांच्या प्रतिमा व पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वंदन वाणी, सचिव गोवर्धन पाटील, संचालक डॉ. विरल वाणी, बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, सौ. नेहा पवार-गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील, संतोष चौधरी, अवधूत दलाल, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी आणि सौ. ज्योती बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूजनानंतर विद्यार्थी राजरत्न पारधे यांनी सादर केलेल्या अभंग गायनाने तसेच शाळेतील शिक्षिकांनी सादर केलेल्या अभंगांनी वातावरण भक्तिरसात रंगून गेले. त्यानंतर विवेकानंद नगर व परिसरातून काढण्यात आलेल्या बालवारकऱ्यांच्या दिंडीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले. दिंडी मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वागत केले. विविध ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. पालकांसह नागरिकांनीही दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दिंडीचा समारोप शाळेच्या परिसरात झाला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले.

वारकरी संप्रदायातील संतांचे जीवनकार्य व शिकवण बालकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक गटात निवांशी चव्हाण हिने सर्वोत्कृष्ट, स्वरा यशोद हिने उत्कृष्ट तर पार्थ बोरसे याने उत्तम पुरस्कार पटकावला. माध्यमिक गटात हेमंत पाटील याने सर्वोत्कृष्ट, दर्शना जगताप हिने उत्कृष्ट आणि भाग्यश्री पवार हिने उत्तम पुरस्कार मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सौ. नेहा पवार आणि सचिन महाजन यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘भक्त पुंडलिक’ ही नाटिका सादर करून वारकरी परंपरेतील भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संदेश प्रभावीपणे मांडला. मैदानावर विद्यार्थ्यांनी संत व वारकरी वेशभूषेत गोलाकार रिंगण करून पावली खेळत पालखी सोहळ्याचा भक्तीमय समारोप केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वंदन वाणी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त पाळण्याचे तसेच प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. योगेश शुक्ल आणि विनोद ढगे यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. उपक्रमाचे नियोजन श्रीकांत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



