जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत, लोखंडी कोयता आणि साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी, २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. या प्रकरणी रात्री ९.३० वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आपल्या शासकीय कर्तव्यावर होते. शनिवारी सकाळी कारवाई करत असताना, संशयित आरोपी अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (वय ६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजी पेठ जळगाव), अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समता नगर) आणि आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) या पाच जणांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
यावेळी त्यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून (क्रमांक एमएच १९ बीएन ००७८) धारदार लोखंडी कोयता आणि लोखंडी साखळी बाहेर काढून ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर धावून येत धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी यांनी या संदर्भात शनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.