पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला धडक; ट्रकचालक जखमी


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील महालक्ष्मी ट्रॅक्टर शोरूमसमोर शनिवारी पहाटे ३.३० वाजता एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकरने पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकवरील चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज कुमार कमाल किशोरसिंह (वय ३८, रा. मुझफ्फरपूर, बिहार) हा तरुण ट्रेलर क्रमांक एमएच ४० एके ९१५१ घेऊन भुसावळमार्गे शेगावकडे जात होता. साकेगाव शिवारात महालक्ष्मी ट्रॅक्टर शोरूमजवळ असताना, त्याच्या पाठीमागून आलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३७ टी ४७७१ ने ट्रेलरला मागून धडक दिली.

या धडकेमुळे ट्रकवरील चालक हर्षल काळे हा गंभीर जखमी झाला. अपघातात त्याच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. धीरजकुमार किशोरसिंह यांनी याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, ट्रकचालक हर्षल काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई करत आहेत.