मुलांनो स्वप्न पाहा, प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन करा !- कवी अशोक कोतवाल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “स्वप्न विकणारा माणूस” हा पाठ वाचून चिन्मय शेंगदाणे, रुद्र मोसे आणि साई सनगिरे या तीन विद्यार्थ्यांनी थेट घरी भेटायला येणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असे उद्गार सुप्रसिद्ध कवी लेखक अशोक कोतवाल यांनी काढले. त्यांच्यासोबत शिक्षक चंद्रकांत भंडारी उपस्थित असल्याचाही त्यांना आनंद झाला. राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त बोलताना कोतवाल यांनी १३-१४ वयोगटातील शालेय मुलांना ज्ञान व जाणिवा समृद्ध करणारी पुस्तके वाचण्याचे आवाहन केले.

कोतवाल म्हणाले की, चरित्रात्मक पुस्तके ज्ञान देतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात आणि जीवनात कसे वागावे, मेहनतीने कसे पुढे जावे, कठीण परिस्थितीत खंबीर कसे रहावे, हे शिकवतात. त्यामुळे मुलांनी प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन करून स्वप्न पाहण्यास शिकावे.

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चिन्मय शेंगदाणे, रुद्र मोसे आणि साई सनगिरे या तीन विद्यार्थ्यांना ‘लेखक असतो कसा’ याची उत्सुकता होती. याच उत्सुकतेपोटी त्यांनी शिक्षक चंद्रकांत भंडारी यांच्यासोबत अशोक कोतवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. ‘स्वप्न विकणारा माणूस’ या धड्याच्या निमित्ताने त्यांनी कोतवाल यांच्याशी विविध प्रश्न विचारत जवळपास तासभर गप्पा मारल्या आणि छानसा संवाद साधला.

या प्रसंगी चंद्रकांत भंडारी यांनी स्वतः लिहिलेली तीन पुस्तके कवी अशोक कोतवाल यांना भेट देऊन त्यांचे स्वागत केले. तर, कोतवाल यांनी आपले ‘गाव आनंदाचे गाणे’ हा बालकविता संग्रह या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिला. हा उपक्रम मुलांना वाचनाची आणि लेखकांबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.