महिलाविश्‍व आणि कोविड ! (ब्लॉग)

आज जागतिक महिला दिन ! त्यानिमित्त कोविडने महिलाविश्‍वावर काय परिणाम केला ? महिलांना ह्याचा काय फटका बसला ? व अश्या परिस्थितीतही तीचे स्थान काय होते याबाबत वैद्यकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या डॉ. गीतांजली ठाकूर यांचा हा विशेष लेख.

कोविड १९ ह्या विषाणू ने होणार्‍या संसर्गाने संपूर्ण विश्‍वाला चिंतीत करून टाकले आहे ! डिसेंबर २०१९ पासून चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेला कोविडची भयावहता थांबलेली नाही.

कोविड चा संसर्ग हा गरीब -श्रीमंत , महिला – पुरुष , , लहान मुले – ज्येष्ठ व्यक्ती , झोपडपट्टीतील निवासी की राजमहालातील महानुभाव…असा कुठलाही भेद न करता, सगळ्यांनाच होत आहे. अर्थात, हे जरी खरे असले तरी ह्या संसर्गाचा विविधांगी परिणाम वेगवेगळ्या घटकांवर कमी अधिक प्रमाणात कसा झाला आहे ? त्याचे दूरगामी परिणाम काय राहणार आहेत ? त्यावर काय उपाय योजना कराव्या लागतील ? व ह्या आपत्तीचा सामना करत असतांना कुठल्या उत्तम पद्धती होत्या ? अनुभव कसे होते ? व ह्या संसर्गामुळे किंवा त्यासाठी केल्या गेलेल्या विविध उपाययोजना अर्थात लॉकडाऊन चे काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम ह्या विविध घटकांवर काय झाले ते अभ्यासणे जरुरीचे आहे.

कारण अशा अनुभवांतूनच भविष्य काळात उद्धभविणार्‍या ह्या व अशा महामारींचा सामना करतांना विविध उपाययोजना राबवितांना योग्य ते धोरण शासन व राज्यकर्ते आखू शकतात. व्यक्ती, समाज, गावं, देश हे पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे ! पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी जगभरात चर्चिले जाणारे; पडताळून पाहिले जाणारे अभ्यास व त्यातून निघणार्‍या निष्कर्षांचे विचार हे आरंभबिंदू असू शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे की अश्या वैश्‍विक आपत्ती प्रचंड बदल विश्‍वजीवनात घडवत असतात व या स्थीतीत वेगवेगळ्या घटकांनी उचललेली पावले आपल्या आजूबाजूला तरंगणार्‍या विचारातून जन्माला, आकाराला येत असतात !

यापूर्वी देखील स्पॅनिश फ्लू, झिंका व स्वाईन फ्लू च्या साथी नंतर केला गेलेला अभ्यास व निरीक्षणे कामात पडलेली आहेत. ज्या घटकांवर सगळ्यात जास्त विपरीत परिणाम ह्या महामारीमुळे झाला आहे; त्यांना परत असा फटका बसू नये ह्यासाठी काळजी आपण व शासन घेऊ शकते. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त प्रभावीपणे जो घटक ह्या महामारीत प्रभावित झाला असेल किंवा ह्या आपत्तीला सामोरे जातांना ह्या घटकांचे योगदान मग ते संख्यात्मक असेल की परिणामात्मक , वा गुणांत्मकदृष्टया प्रभावी असेल अश्या घटकांचा अभिव्यक्तींचा , ज्ञानाचा , अनुभवांचा समावेश जर पुढील तयारीत व धोरण आखणीत करून घेतला तर नक्कीच आपण अश्या आपत्तींना तोंड देण्यास सक्षम होऊ शकता.

कोवीड ची बाधा होण्याच्या संख्यात्मक प्रमाणात महिला कि पुरुष ह्यांची आकडेवारी अभ्यासली कि महिलांची संख्या सर्वसाधारणपणे जास्त आढळून आली आहे पण अतिगंभीर कोवीड किंवा यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र पुरुषांमध्ये जास्त दिसून आलेले आहे.

धुम्रपान, मद्यपान आदी व्यसनाधीनता; कमी असलेली प्रतिकारशक्ती, पूर्वीपासून जास्त प्रमाणात असलेले रक्तदाब व इतर आजार ,त्याचप्रमाणे प्रवास जास्त करण्याचे प्रमाण व चाचण्यांनाही महिलांपेक्षा जास्त सामोरे जाण्याचे प्रमाण हे पुरुषामध्ये जास्त असल्यामुळे हा भेद दिसून येतो. कोविड मुळे जीव गमावणार्‍या व्यक्तींची आकडेवारी तपासली तर सर्वसाधारणपणे दहा पैकी एक महिलेचा समावेश असतो.

लक्षात घेतले पाहिजे कि विश्‍वातील किंवा आपल्या देशात सुद्धा आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अंदाजे ७० टक्के महिला कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे घरी राहणार्‍या गृहिणींवरही कोविडच्या काळात अनेक संकटे उभी राहिली आहेत. महिलांच्या आरोग्यच नव्हे तर रोजगार , शिक्षण , मानसिक स्थिती , आर्थिक विषय ह्यावर विपरीत परिणाम झालेले असून शारीरिक अत्याचार, घरगुती हिंसा यातही वाढ झालेली आहे. त्यामुळे कोव्हीड १९ ह्या आजाराकडे आपण एक आरोग्याचा विषय किंवा आव्हान म्हणून न पाहता समाजातील उपेक्षित अश्या महिला वर्गाला जो आधीपासूनच लैंगिक भेदभावाने पीडित आहे आणि हा असा मोठा समूह ज्याचा ज्ञान व कौशल्याचा वापर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमध्ये किंवा सेवा व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकठिकाणी पण अल्प मोबदल्यात केला जात आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या समस्यांकडे चांगल्या लिंगभावाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

कोविडच्या काळात आपल्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. जिल्हा , तालुका , महिला रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्र ह्यांच्या माध्यमातून फक्त कोविडवरच लक्ष केंद्रित झाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गातील महिलांमध्ये लैंगिक व प्रजनन आरोग्य सेवेची साधने मिळविण्यात प्रचंड अडचणी आल्या. लॉकडाऊन, औषधांची कमी झालेली उत्पादने , डॉक्टरांची बंद असलेली हॉस्पिटल्स आणि सोनाग्राफी व इतर निदान केंद्रे, रुग्णवाहिका मिळण्यास येत असलेल्या अडचणी; प्रवासावरील निर्बंध ह्यामुळे महिलांना विविध आरोग्याच्या अडचणींना सामोरे जावे लागले. प्रसुतीपूर्व, प्रसूती व प्रसूतीनंतरच्या आरोग्य सुविधा मिळविण्यात महिलांना प्रचंड अडचणी आल्या. गर्भपाताचे प्रमाण वाढले. वेळेपूर्वीच प्रसूती झाल्या. कमी वजनाचे बाळ जन्माला यायचे प्रमाण वाढले. कौशल्यपूर्ण व तातडीच्या आरोग्यसेवा मिळविण्यास आलेल्या अडचणींमुळे एकंदरीतच माता व बाळ मृत्युदराचे प्रमाण वाढले !

गर्भनिरोधक साधनांचा वापर कमी झाल्यामुळे; ती सुलभतेने व माफक दरात उपलब्ध न झाल्यामुळे अनैच्छिक गर्भारपण अनेक महिलांना स्वीकारावे लागले. अंदाजे दोन कोटी इतकी प्रचंड संख्या अश्या केसेसची राहू शकते. ही आकडेवारी गंभीर आहे. तर असुरक्षित गर्भपाताच्या प्रमाणाचीही टक्केवारी ह्या काळात वाढलेली होती .त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता अवलंबिणार्‍या साधनांचा साठा खंडित झाल्यामुळे आणि गुप्तरोग व लैंगिक रोग विरोधी मेडिसिन माफक दरात व सहजपणे उपलब्ध न झाल्यामुळे अश्या आजारग्रस्त महिलांची कुचंबणा ही ह्या संकटसमयी बघण्यास मिळाली.

कोविड व लॉकडाऊन च्या काळात महिला व लहान मुले ह्यांच्यावर होत असलेल्या लैंगिक अत्याचार व छळ , हिंसा ह्यात प्रचंड वाढ झालेली होती. आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांच्या घरी, रोजगार गेल्यामुळे, वैफल्यग्रस्त व व्यसनाधीन कुटुंबियांकडून, सामाजिक दुरावलेपणामुळे, पूर्वीचे आजार बळावल्यामुळे व एकंदरीत ह्या सगळ्या अनपेक्षित प्रकाराशी जुळून न घेता आल्यामुळे पुरुषाकडून होत असलेल्या लिंगाधारित अत्याचारात, घरगुती हिंसेत वाढ झालेली दिसली.

कोवीड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न ह्याच वेळी वैरणीवर आला होता तर कामाच्या ठिकाणी होणार्‍या महिलांच्या मानसिक व शारीरिक छळा च्या घटनेतील आकडेवारीतही वाढ झालेली दिसून आली होती. सामाजिक दुरावलेपणा , एकटेपणा , मरण्याची भीती , परिवाराची चिंता , आर्थिक चिंता , रोजगाराची अनिश्‍चितता ,संवादाचा अभाव , नकारात्मक वातावरण , फ़िरण्यास बंदी , व कामाचा अतिरिक्त ताण ह्यामुळं महिलांमध्ये मानसिक तणाव , चिंता व डिप्रेशन ह्यासारखे आजार बळावल्यानेही निदर्शनास आलेले आहेत !

लेख – डॉ . गीतांजली नरेंद्र ठाकूर !

( लेखिका ह्या रेडिओलॉजिस्ट असून राजकीय – सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एरंडोल नगरपालिकेच्या कोरोना ब्रँड अँबेसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे ! कोविड च्या काळात डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध संस्थानी त्यांचा सन्मान केलेला आहे !)

संपर्कसूत्र : ९८६००८०६६० !dr. thakur

Protected Content