गाळेधारकांच्या प्रश्‍नावर नगरविकास मंत्र्यांकडे होणार बैठक !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गाळेधारकांच्या प्रश्‍नांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजीत करण्यात येईल असे आश्‍वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्यामुळे गाळेधारकांच्या संघटनेने आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.

मनपा विरोधात १६ अव्यवसायिक, अविकसीत मार्केट गाळेधारकांनी मार्केट बेमुदत बंद ठेवली होती. या प्रश्‍नी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, पंकज मोमाया, तेजस देपुरा आदी पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गाळेधारकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच मीटिंग लावून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे उपस्थित होते.

पालकंमत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विचारविनिमय करुन गाळे नियमित सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Protected Content