चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध जाहिरातींमुळे शहराला विद्रूपीकरण निर्माण झाले असून हे बॅनरबाजी तात्काळ थांबविण्यात यावी, यासाठी संभाजी सेनेनेतर्फे आज (दि.27) चा.नगरपालिका प्रशासनास एक तासाची मुदत देत सर्व बॅनर काढण्यात यावे, अन्यथा सेनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने सर्व बॅनर काढण्यास सुरुवात केली आहे.
शहरामध्ये विविध प्रकारांचे, वाढदिवसांचे अनेक कार्यक्रमांचे फलक लावून शहर विद्रुपीकरण केले जाते होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सध्या काम सुरू आहे. त्यावर देखील विविध कार्यक्रमांचे बॅनर लावून जाहिरातबाजी सुरू झालेली आहे. तरी ही बॅनरबाजी तात्काळ रोखण्यात यावी, अशी मागणी संभाजी सेनेतर्फे चाळीसगाव नगरपालिका प्रशासनास करण्यात आली असून शहरातील सर्व बॅनर पोस्टर एका तासात काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. बॅनर न काढल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे देखील यावेळी सांगण्यात आले होते. आंदोलनाचा इशारा देताच चाळीसगाव नगरपालिका खडबडून जागी झाली आहे.
नगरपालिकेची दखल
नगरपालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाढदिवसाचे तसेच विविध हॉटेलच्या जाहिरातींचे व काही कार्यक्रमांचे लागलेले बॅनर काढून चौक बॅनर मुक्त केला जात आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शिवसृष्टी उभारली जात आहे. येथेही काही महाभागांनी बॅनर लावल्याचे दिसून आल्याने संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी संताप व्यक्त केला असा प्रकार पुन्हा कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी दिला. शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी संभाजी सेनेने केलेले हे अनोखे आंदोलन चाळीसगावकरांचा कौतुकाचा विषय होत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी संभाजी सेनेच संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे, रवींद्र शिनकर, बंटी पाटील, कृष्णा पाटील, लक्समन बनकर, घनश्याम सोनार, राकेश पवार, दिवाकर, राकेश जोशी, आधार महाले, गणेश वाघ, सुनील पाटील, सचिन जाधव, गोपीनाथ घुगे, संदीप जाधव, कुणाल आराक, विजय सगळे, गणेश गीते, अशोक देवरे, सुरेश पाटील, भैय्यासाहेब देशमुख, सुयोग नरवाडे, सुरेश तिरमली आदी उपस्थित होते.