चारित्र्याचा निकष भाजप पक्षश्रेष्ठी विधानसभेतही लावणार का?

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कथित फोटोंमुळे त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा आहे. परंतु ‘सापडला तो चोर’ असं साधं गणित भाजपने मान्य केले असल्याचे दिसून येतेय. परंतु जळगाव जिल्ह्यात याआधी असे जाहीर आरोप झालेल्या नेत्यांना भाजपने कधीही उमेदवारी नाकारल्याचा इतिहास नाहीय. उलट अशा नेत्यांना बढतीच दिली आहे. त्यामुळे ए.टी.नानांचा निकष विधानसभेतही लावणार का? अशा अडचणीत आणणाऱ्या प्रश्नाला आता भाजपला सामोरे जावे लागणार आहे. कारण चारित्र्य आणि नैतिकतेचा निकष फक्त विशिष्ट व्यक्तीलाच लावता येत नसतो, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

 

भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर जळगाव जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, ए.टी.नानांचे सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो खरे की खोटे? हे अजून स्पष्ट नाहीय. एवढेच काय, कोणत्याही महिलेने थेट आरोप देखील केलेले नाहीत. मग तरी देखील तिकीट का कापले गेले?. दुसरीकडे जळगाव सेक्स स्कॅन्डल आणि रेस्ट हाऊस कांड, हे अवघ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलंय. अगदी नावानिशी आणि फोटोंसह कित्येक दिवस बातम्या छापून आल्या आहेत. मग त्यांना देखील आगामी विधानसभेचे तिकीट देतांना ए.टी.नानांचा निकष लावणार का? असा प्रश्न खाजगीत ए.टी.पाटील यांचे समर्थक उपस्थित करताय. त्याच पद्धतीने महापालिकेतीलही काही बड्या नेत्यांवर विविध पद्धतीचे (फौजदारी व दिवाणी) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना उमेदवारी न देण्याचे तर सोडा उलट निवडून आल्यानंतर मोठी पदं दिली गेलीत. मग आता याला काय म्हणायचे? असा प्रश्न नानांच्या समर्थकांनी विचारणे स्वाभाविक आहे.

 

कथित फोटोंचे वादळ उठल्यानंतर ए.टी.पाटील यांचे नाव कोणत्याही दैनिकाने छापलेले नाहीय. दुसरीकडे नव्वदच्या दशकात एका रेस्ट हाऊसवरील कांड आणि जळगाव सेक्स स्कॅन्डलवर जवळपास सर्वच दैनिकात सलग कित्येक दिवस अगदी फोटोंसह काही जणांची नावं छापून आली होती. त्यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. तरी देखील संबंधितांचे राजकीय करिअर संपुष्टात आले नाही किंवा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्या नाहीत. मग आताच असं काय घडलंय की, सलग दोनदा विजयी ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेले.

 

मुळात सापडला तो चोर, असं सोपं गणित जर भाजप मान्य करत असेल तर हाच निकष मग सर्वाना लावाला गेला पाहिजे. कारण खरं-खोटं कुणी सिद्ध करावं? अहिराणी भाषेत एक म्हण आहे, ‘हलकी वडांग देखीसन कोणी भी पाय ठेवस’ अर्थात स्वभावाने गरीब असलेल्या माणसाला कुणीही दादागिरी दाखवू शकते, मारू शकतो. ए.टी.नाना राजकीयदृष्ट्या अशीच हलकी वडांग होती. म्हणूनच त्यांच्यावर चाल करण्याची हिंमत झाली. परंतु ए.टी.नाना यांच्यापेक्षा गंभीर आरोप असलेली मंडळी आज भाजपात उच्च पदांवर आहेत. अशा बड्या नेत्यांना पण विधानसभेचे तिकीट देतांना ए.टी.नानांचा निकष लावण्याची हिंमत भाजप पक्षश्रेष्ठी दाखवेल का? हेच बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Add Comment

Protected Content