पीक विमा काढण्यात नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार १४२ शेतकरी सहभागी झाले आहेत. ३१ जुलैपर्यंत या योजनेची अंतिम मुदत असून जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो, आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समायीक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता. मात्र २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याच निर्णय घेतला. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ४२९ कर्जदार आणि ३ लाख २१ हजार ७१३ बिगर कर्जदार अशा एकूण ३ लाख ३३ हजार १४२ शेतकऱ्यांनी ३ लाख ३९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा उतरवला आहे.

कृषीच्या नाशिक विभागांतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. यात नाशिकमध्ये – ३३०५६२, धुळे – १५५७६४, नंदुरबार – ८८११७ व  जळगाव – ३३३१४२ शेतकऱ्यांनी पीक योजनेत सहभाग नोंदवला आहे.  जळगाव जिल्हा नाशिक विभागात अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एक रूपयात पीक विमा पोटी १३१६.०७ कोटी रूपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे.

मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५८६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण १६८.६१ टक्के आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल, सध्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा जागर करण्यात आला.

जिल्ह्यातील तीन उपविभागीय कृषी अधिकारी, १५ तालुकास्तरीय कृषी अधिकारी आणि जवळपास २७४ कृषी सहाय्यक यांनी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवली. त्यातूनच यावर्षी खरीप हंगामात या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उच्चांकी सहभाग झाला आहे.

Protected Content