पट्टेदार वाघाचे दर्शन न झाल्याने वन्यजीव प्रेमींची निराशाच

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर मंगळवार १६ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी , वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. यात वन्यप्राण्यांच्या प्रगणनेसाठी बहुतांश नियोजित ठिकाणी वनविभागा कडून मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. परन्तु वन्यजीव कमी आल्याने तसेच पट्टेदार वाघाचे दर्शन न झाल्याने डोलारखेडा परिसरात वन्यजीव प्रेमींची निराशाच झाली.

दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या बुद्धपौर्णिमेस राज्यशासन वनविभागाकडून वन्यप्राणी प्रगणना केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यात संसर्गप्रादुर्भावामुळे वन्यप्राणी प्रगणनेवर निर्बंध होते. यावर्षी निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे १६ मे बुद्धपौर्णिमेच्या दिवशी जिल्ह्यातील मुक्ताई भवानी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह वनपरिक्षेत्रात डोलारखेडा, चारठाणा, भागात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात वनविभागाकडून करण्यात आलेल्या मचाणांवर व्यवस्थेनुसार वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते सज्ज झाले होते. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या प्रगणनेचा उपक्रम वनविभागाकडून आयोजित केल्यानुसार जळगांव जिल्ह्यातही या दिवशी १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजेपासून वन्यजीव प्रगणनेला सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता प्रगणनेचा समारोप करण्यात आला.

दुई शिवारात पट्टेदार वाघाने रस्त्यावरच मांडले ठाण
डोलारखेडा भागात वाघांचा मुक्त संचार असल्याने प्रत्येक वन्यजीव प्रेमीना पट्टेदार वाघ पाहण्याची उत्सुकता होती. प्रत्येक कृत्रिम आणि नैसर्गिक पांणवठ्यांवर मचाणाच्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या. परंतु वाघाने दुई शिवारात रस्त्यावर ठाण मांडले होते. वाघ निघून गेल्यावर वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाली म्हणून उत्साह वाढला. दरम्यान प्रत्येक वन्यजीव प्रेमींनी रात्र जागून काढली. परंतु पाणवठे असलेल्या भागात वाघाने दर्शन झालेच नाही.

सायाळ, चितळ, भेकर, नीलगाय, लंगुर, चिंकारा, मुंगूस, ट्री श्रु (झाड चिचुंद्री), सारखे वन्यजीव रात्रीच्या लक्ख चंद्रप्रकाशात निर्धास्तपणे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आल्याचे दिसल्याने अनेक वन्यजीव प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. परंतु त्यामानाने उत्तर डोलारखेडा भागात वन्यजीव प्राणी कमी संख्येने आढळून आल्याने लोखंडी मनोऱ्यावर उपस्थित वन्यजीव प्रेमींची यावर्षी काहीशा प्रमाणात निराशा झाली असल्याचे बाळकृष्ण देवरे यांनी म्हटले आहे.
वन्यजीव प्रगणनेत नोंदवला सहभाग
यावेळी जिल्हाभरातून वन्यजीव प्रेमी तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, अमन गुजर, वासुदेव वाढे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, कल्पेश तायडे, छाया ढोले, रोहित श्रीवास्तव, आकाश चौधरी, चेतन हिरे, नितीन जोशी, कुशल अग्रवाल, यांनी प्रगणनेत सहभाग नोंदवला.
डोलारखेडा वनक्षेत्रात १५ सदस्य दाखल झाले होते. यात जळगांव मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, नाशिकचे मानद वन्यजीव रक्षक अमित खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव प्रेमींनी प्रगणना कार्यक्रम यशस्वी केला. वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात पाणीपुरवठा करण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या.

जिल्ह्यातील या महत्वाच्या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, रानकुत्रे, लांडगे, तडस, गवा यासह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठी असल्याने वन्यजीव प्रेमींनी डोलारखेडा आणि चारठाणा भागास प्रथम पसंती दिली. बुद्धपौर्णिमेला चंद्राचा प्रकाश असतो. वन्यप्राणी सायंकाळनंतर पाणवठ्यांवर येत असल्याने गणनेस मदत झाली.
रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक डोलारखेडा

उत्तर भागात तृणभक्षी प्राणी संख्या जास्त आहे याचं भागात गवताळ कुरण विकसित करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे , वनविभागाने उत्कृष्ट लोखंडी मनोरे आणि कृत्रिम पाणवठे बांधले असून या भागात पाणी पोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते जर या ठिकाणी बोअर आणि सोलर पंप उभारला तर इतरत्र भटकणारे वन्यजीव याच भागात राहतील.
बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

Protected Content