चाळीसगाव परिवहन आगारात समुपदेशन व कायदेविषयक शिबीर उत्साहात

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील आगारातील कर्मचारी हे परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन व कायदेविषयक शिबीर आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आले.

राज्य शासनात विलीनीकरण करावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहेत. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपातून कर्तव्यावर परतलेल्या कर्मचाऱ्यांनी दबाव व दडपण न घेता आपली दैनंदिन कामगिरी पार पाडावी . तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने चाळीसगाव आगारातील कर्मचारी हे पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले आहे. या पाश्र्वभूमीवर समुपदेशन व कायदेविषयक साक्षरता प्रबोधन शिबिर आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आले. यावेळी समुपदेशन व कायदेविषयक बाबींसंबंधी ॲड. निलेश निकम यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच सर्वसामान्यांची जनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीची सेवा नव्या दमाने देण्यासाठी सज्ज असलेल्या संपातून परतणार्‍या कर्मचाऱ्यांचे अॅड. निकम यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर प्रश्नोत्तरांच्या सत्रात कर्मचाऱ्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून कामगिरीवर असताना सकारात्मकता कशी वाढवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राज्य परिवहन महामंडळातील सद्यस्थितीत कामगिरीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन व सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याबाबत त्यांनी आश्वासित केले. दरम्यान कर्मचाऱ्यांनी निर्धास्तपणे कामगिरी करावेत. प्रशासन खंबीरपणे कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहील असे सुतोवाच कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी केले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब जी.डी. जाधव हे उपस्थित होते. जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक म.भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानक प्रमुख किशोर मगरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांताराम पाटील, किरण काकडे, फरीद मुल्ला, भाऊसाहेब हडपे, विनोद देशमुख, लक्ष्मीकांत बोरसे, दीपक जाधव, सुरेश गायकवाड, किशोर कुमावत, बि.टी. चौधरी, किशोर नागरे, प्रकाश मोरे, संजय जाधव, हेमराज जाधव, सईद शेख, शांताराम घुगे, सुधीर जाधव, शैलेश राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content