सावखेड्यातील भैरवनाथ मंदिरातून चोरी करणारा आरोपी जेरबंद – पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची कामगिरी

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील सावखेडा भैरवनाथ मंदीरातून अज्ञात चोरट्याने रात्री कुलुप तोडून दानपेटीत पैसे, देवाच्या चांदीच्या छत्र्या व चैना चोरुन नेल्या होत्या. गोपणीय माहितीच्या आधारे कारवाई करत पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी चोरी करणाऱ्या आरोपी जेरबंद केले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “दि.१७ जानेवारी रोजी पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनला सावखेडा बु. ता. पाचोरा येथील भैरवनाथ मंदीरातून अज्ञात चोरट्याने रात्री कुलुप तोडून दानपेटीत पैसे व देवाच्या दोन किलो चांदीच्या छत्र्या व चैना चोरुन नेले होते. त्याप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात भैरवनाथ मंदीर सावखेडा बु. येथून मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन दि.२८ जानेवारी २०२२ रोजी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, सचिन वाघ असे पथक तपास करण्यासाठी रवाना झाले.

पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनच्या सीमेजवळील सोयगाव ते कंकराळा, मेनगाव फाट्याजवळून गुन्ह्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात कंकराळा गावी राहणार आरोपी भानुदास गंगाधर सोनवणे (वय – ३०) यास पोलीसांनी ताब्यात घेतले.” आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल चांदीच्या साखळ्या व छत्र्या हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय माळी हे करीत आहे.

Protected Content