‘ते’ पत्र पाठवले कुणी ? : राष्ट्रपतींकडेही पोहोचले नाही

download 6

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा आरोप करणारे आणि त्याबाबत नाराजी व्यक्त करणारे माजी सैनिकांच्या सह्यांचे पत्र राष्ट्रपतींना पाठवल्याच्या वृत्तानंतर वाद उफाळून आला आहे. या कथित पत्रावरून माजी सैनिकांनी वेगवेगळा सूर आळवला आहे. माजी लष्करप्रमुख एस.एफ. रॉड्रिग्ज आणि एअर चीफ मार्शल (निवृत्त) एन.सी. सुरी यांनी या पत्राबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. हे पत्र वाचल्यानंतरच आपल्या नावाचा त्यात समावेश करण्याची अनुमती दिली होती, असं मेजर जनरल (निवृत्त) हर्ष कक्कड यांनी सांगितलं. माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही पत्र लिहिल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, माध्यमांमध्ये व्हायरल झालेलं अशा आशयाचं कोणतेही पत्र राष्ट्रपतींना मिळालेले नाही, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिली आहे.

 

लष्करी कारवायांचं श्रेय लाटणे, सैनिकांच्या फोटोसह पोस्टर झळकावणे, लष्कराच्या गणवेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोटो, विशेषतः हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या फोटोचा राजकीय फायद्यासाठी करण्यात येणाऱ्या वापरावर काही माजी सैनिकांनी पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. या पत्रावर आठ माजी लष्कर प्रमुखांच्याही सह्या आहेत. त्यात जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज, शंकर रॉय चौधरी, दीपक कपूर, अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, विष्णू भागवत, अरुण प्रकाश, सुरेश मेहता आणि एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचार सभेत सेनेचा उल्लेख ‘मोदीजी की सेना’ असा केला होता. त्यावरही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा बाबी राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला मारक ठरू शकतात. सुरक्षा दलांची निधर्मी आणि अराजकीय अशी प्रतिमा जपण्यासाठी ठोस पावलं उचलावीत, असे आवाहन त्यांनी राष्ट्रपतींना केले आहे. दरम्यान, माध्यमांमध्ये व्हायरल झालेलं अशा आशयाचं कोणतेही पत्र राष्ट्रपतींना मिळालेले नाही, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिली आहे. तसंच या पत्रावर ज्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत, त्यातील जनरल एसएफ रॉड्रिग्ज, एन.सी. सुरी यांनी या पत्राबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही, अशा कोणत्याही पत्रावर सही केली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अशा आशयाच्या कोणत्याही पत्रासाठी माझ्याकडून परवानगी घेतलेली नाही आणि असे कोणतेही पत्र मी लिहिलेले नाही, असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एम.एल. नायडू यांनी स्पष्ट केले आहे. ‘अॅडमिरल रामदास (निवृत्त) यांनीही हे पत्र पाठवलेले नाही. ते मेजर चौधरी यांनी पाठवलेले आहे. अशा कोणत्याही पत्रासाठी माझी परवानगी घेतलेली नाही. मी त्याच्याशी सहमत नाही. आमचं मत चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आले आहे. असं कोणतंही पत्र मी लिहिलेले नाही,’ असे एअर चीफ मार्शल (निवृत्त) एन.सी. सुरी यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content