टागोरांच्या भूमिकेतून रूझवेल्टच्या भूमिकेत शिरा : राऊतांचा मोदींना सल्ला !

मुंबई प्रतिनिधी । देशाची अर्थव्यवस्था कोसळली असून मंदिच्या लाटेने सर्वच गटांगळ्या खातील अशी अपेक्षा आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी किमान पश्‍चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर तर टागोरांच्या भूमिकेतून प्रेसिडेंट रूझवेल्ट यांच्या भूमिकेत शिरावे असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या आजच्या रोखठोक या स्तंभातून आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आज देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. २९ ऑक्टोबर १९२९ रोजी अमेरिकेतील वायदे बाजार कोसळला आणि तेथे एक भयानक मंदीची लाट आली, पण वर्षभर अगोदर तेव्हाचे अध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज आपल्या देशातही आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरू नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील चोवीस तास सुरू आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई आहे व कब्रस्तानात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही.

यात पुढे म्हटले आहे की, मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे श्री. मोदी सांगतात. हे काही कोसळणा़र्‍या अर्थव्यवस्थेवरील रेमडेसिवीर उपचार नव्हेत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे श्री. अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्‍नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत. अमेरिकेत मंदी असताना तेव्हाचे राज्यकर्ते आत्मसंतुष्ट होते, आत्मप्रौढीत मशगूल होते. १९३० च्या जूनमध्ये एक शिष्टमंडळ अध्यक्ष हुवर यांना भेटून परिस्थितीची कल्पना देण्यासाठी गेले, पण हुवर त्यांना म्हणाले, मित्रांनो! तुम्ही दोन महिने उशिरा आलात. कारण मंदी दोन महिन्यांपूर्वीच संपली! वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती.

तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष हुवर हे जरी आत्मसंतुष्ट होते तरी त्यांचे विरोधक, जे फ्रँकलिन रुझवेल्ट, ते नव्हते. त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि सरकारी खर्चात कपात, उत्पादन वाढ आणि बेकार, निराश्रित यांना सहाय्य असा कार्यक्रम मांडला. त्यांनी यावर निवडणूक जिंकली. अर्थात अमेरिकेच्या अर्थव्यवहाराला गती आणण्यासाठी त्यांना सरकारी खर्चात कपात न करता प्रचंड वाढ करावी लागली. मोठमोठी सार्वजनिक कामे त्यांनी हाती घेतली. त्यामुळे रोजगार वाढला, उत्पादन वाढले. प्रचंड धरणे, रस्ते, वीज उत्पादन ही कामे त्यांनी हाती घेतली. रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील अत्यंत हुशार, लोकहितदक्ष अशा बुद्धिमान लोकांचे वर्तुळ स्वतःभोवती जमवले. त्यात मार्गेन्थॉ, लिविस डग्लस, हॅरी हॉपकिन्स यांसारखे होते. आपला नवा आर्थिक कार्यक्रम रुझवेल्ट यांनी जाहीर केला. तेव्हा आठ दिवस अमेरिकेच्या बँका बंद होत्या. आठ दिवसांनी प्रे. रुझवेल्ट यांनी आकाशवाणीवरून त्यांची मन की बात मांडून अमेरिकन नागरिकांशी हितगुज केले. पुढे त्यांचे हितगुज म्हणजे ङ्गमन की बातफ ही नित्याचीच बाब झाली. रुझवेल्ट यांच्या भाषणाची लोक वाट पाहू लागले. रुझवेल्ट यांचे भाषण होताच अमेरिकन लोकांत एकदम विश्‍वास निर्माण झाला. या भाषणानंतर पहिल्या तीन महिन्यांत सर्वच राष्ट्रीय बँकांनी, आर्थिक संस्थांनी जोरात उलाढाल सुरू केली. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मरगळ व उदासीनता झटकली गेली. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रूपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय? आपल्याला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा.

या लेखात शेवटी म्हटले आहे की, कोणी काही म्हणा, प. बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदी यांनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे! देशाला त्याचीच गरज आहे. देशाला आता विश्‍वास आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.