‘त्यांना’ शाहू-फुले-आंबेडकर काय समजणार ? : जितेंद्र आव्हाड

पिंपरी – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । ”ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पुरंदरेंनी पोहचवले असं वाटत आहे त्यांना शाहू-फुले-आंबेडकर काय समजणार ?” अशा शब्दात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. येथे आपल्या भाषणातून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेले दोन चार दिवस महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाराष्ट्रातील विद्वान माणूस पवारसाहेब यांच्याबद्दल बोलला की छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेतच नाहीत. ते नेहमी फुले, शाहू, आंबेडकर म्हणत असतात. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पुरंदरेंनी पोहचवले असं वाटत आहे त्यांना शाहू फुले आंबेडकर काय समजणार? मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काही चालतं. याची, त्याची नक्कल करा. इतिहास आणि पुस्तकं वाचा. फुलेंचं समाजातील योगदान तुम्हाला कळणार नाही, असा टोला देखील त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांची वाट दाखवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. फुलेंनी जे कार्य केले त्यांचा प्रभाव, आदर्श शिवाजी महाराज होते. सती प्रथेची व्यवस्था समाजात होती, त्याच काळात शिवाजी महाराज यांनी आईला सती जाऊ दिलं नव्हतं. ते कर्मकांडाच्या कायम विरोधात होते. फुलेंची भूमिका शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होती. त्यामुळे ते शिवाजी महाराज यांचे वारसदार होते. शाहू महाराज तर त्यांचे रक्ताचे वारसदार होते. म्हणून या दोघांना आदर्श मानतो आणि संविधान लिहितो असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा संविधानात आला. फुले, शाहू यांना संविधानात बंद केले. या तिघांचं नाव घेतलं तर शिवाजी महाराज यांच नाव घेतल्यासारखं आहे. पण हे समजायला अक्कल लागते असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले.

 

Protected Content