Home Uncategorized फैजपूरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

फैजपूरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

0
6

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक अडचणींचा अडथळा ठरू नये, या उद्देशाने लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना जे. टी. महाजन पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रदीप राणे यांनी शिक्षण ही मानवी जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असून ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत,”* असे प्रतिपादन केले.

फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य तथा लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे होते. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून दरवर्षी शहरातील गरीब, गरजू व निराधार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण केले जाते. यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य प्रदीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर जीवनात यश मिळविण्याचा संदेश दिला. शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आत्मविश्वास वाढतो आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि चांगले संस्कार जोपासण्यावर भर द्यावा, असे सांगितले. समाजातील सक्षम घटकांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यास शिक्षणाचा प्रसार अधिक प्रभावी होईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्राचार्य प्रदीप राणे, चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाइस चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, सुरेश परदेशी, मुख्याध्यापक के. टी. तलेले, भास्कर बोडे, अप्पा चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक एस. ओ. सराफ, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. पी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती ललिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ए. टी. महाजन, व्ही. एम. भोईर, महेंद्र वायकोळे, राजेंद्र मिस्त्री आणि राजेंद्र मानेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. हेमांगी कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Protected Content

Play sound