जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामासाठी हवामान आधारित पुर्नरचित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या मार्फत महसूल मंडळ स्तरावर राबवण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू आणि सिताफळ या फळपिकांचा समावेश असून हवामानातील अति पाऊस, पावसाचा खंड, तापमानातील चढ-उतार यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना ऐच्छिक असून कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकरी दोघांनाही सहभागी होता येणार आहे.
प्रत्येक शेतकरी एका हंगामासाठी एका फळपिकासाठीच विमा संरक्षण घेऊ शकतो. जर कर्जदार शेतकऱ्याला विमा योजनेपासून वगळायचे असेल, तर त्याने नोंदणीच्या अंतिम तारखेच्या ७ दिवस आधी बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे. अन्यथा, तो शेतकरी योजनेत सहभागी असल्याचे मानले जाईल व विमा हप्ता थेट कर्ज खात्यातून कपात केला जाईल.
विमा हप्ता व संरक्षणाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे: पेरू – हप्ता ₹3500, संरक्षण ₹70000 (अंतिम तारीख 14 जून, वाढीव 30 जून), मोसंबी – ₹5000 हप्ता, ₹100000 संरक्षण (30 जून), डाळींब – ₹8000 हप्ता, ₹160000 संरक्षण (14 जुलै), सिताफळ – ₹3500 हप्ता, ₹70000 संरक्षण (31 जुलै), लिंबू – ₹4000 हप्ता, ₹80000 संरक्षण (14 जून, वाढीव 30 जून), तर चिकू – ₹6300 हप्ता, ₹70000 संरक्षण (30 जून).
जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचे तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.