जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ शहरात ‘योग संगम’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित हा कार्यक्रम शनीवारी २१ जून रोजी सकाळी ६ वाजता सेन्ट्रल रेल्वे मैदान, भुसावळ येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे भुसावळ विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरणाचे क्षेत्रीय निदेशक पांडुरंग चाटे आणि राजेंद्र फातले हे देखील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
‘योग संगम’ कार्यक्रमामध्ये योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विविध शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे सामूहिक सत्र आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणा देणे हा यामागचा उद्देश आहे.
भुसावळ शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सकाळी ६ वाजण्यापूर्वी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे, जेणेकरून कार्यक्रम सुरळीत पार पडू शकेल. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब असून, केंद्र सरकारच्या उपक्रमांना स्थानिक पातळीवर पाठबळ देण्याचा आणि योगसाधनेला सामूहिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न भुसावळमधून होत आहे.