मोठी बातमी: भुसावळ घरफोडीचा पर्दाफाश: १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक


भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गोदामातून लाखोंच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची घटना १५ आणि १६ जून दरम्यान घडली होती. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत, चोरीला गेलेल्या सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी शिरपूर येथून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी रात्री ६ वाजल्यापासून ते १६ जून रोजी सकाळी ८.४० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मकडीया यांच्या राजस्थान मार्बल जवळील पत्राच्या गोदामाचे शटर उचकावून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी गोदामातून फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्या होत्या. या घटनेनंतर १७ जून २०२५ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, भुसावळ बाजारपेठ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (जळगाव) आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, चोरीचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स येथील एका खाजगी गोदामात ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तत्काळ छापा टाकून पंचांसमक्ष गोदामातून १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी, ज्या गोदामात मुद्देमाल ठेवला होता, त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यू बोराडी ता. शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

मा. पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कृष्णात पिंगळे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल टी. वाघ या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.