रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल गावाजवळ अवैध गौण खनिज वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाल गावाजवळील सुकी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लीलाताई आश्रम शाळेजवळ सापळा रचून तपासणी केली. यावेळी स्वराज कंपनीचा ७४४ एफई ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली विनाक्रमांकाची ट्रॉली वाळूची वाहतूक करताना आढळून आली. चौकशीदरम्यान संबंधितांकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. या कारवाईत एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अशरफ गबू तडवी (रा. पाल) तसेच ट्रॅक्टर मालक चेतन प्रमोद महाजन (रा. कुसुंबा) यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



