Home क्राईम मुक्ताईनगरात पहाटेची धडक कारवाई; १२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त

मुक्ताईनगरात पहाटेची धडक कारवाई; १२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त

0
5

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पूर्णाड फाट्यावर अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहने व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (१७ जुलै) पहाटे सुमारे २.३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. योगराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादीनुसार, उझैल उर्जा खान (रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा), सय्यद आरिफ सय्यद हकीम उर्फ नसीम (रा. पिंपळगाव राजा, जि. बुलढाणा) तसेच एका अन्य संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला वाहतूक करत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती.

कारवाईदरम्यान विविध ब्रँडचा विमल पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन, तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सुमारे ३ लाख ८६ हजार रुपयांचा गुटखा व पानमसाला, ८ लाख २० हजार रुपयांचे वाहन आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या अवैध साखळीमागील इतर संबंधितांचा शोधही घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound