जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत जळगाव जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवावे, यासाठी पात्र पशुपालक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून नैसर्गिक व शाश्वत शेतीला बळकटी देण्यासाठी पशुधन वाढविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद जळगावच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन (CCIF) यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अध्यक्षीय भाषणात शेतीसमोरील हवामान बदल, एल-निनोचा प्रभाव, मजुरांची कमतरता, जमिनीचा खालावत चाललेला पोत, घटती उत्पादकता तसेच ओला व सुका दुष्काळ यांसारख्या आव्हानांचा उल्लेख केला. पशुधनाची संख्या घटल्यामुळे नैसर्गिक शेतीवर विपरीत परिणाम होत असून रासायनिक खतांवरील अवलंबित्व वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पशुधन योजना ही नैसर्गिक, विषमुक्त आणि शाश्वत शेतीला चालना देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी जिल्ह्यातील पशुपालकांनी योजनेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी स्रोत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य प्रशिक्षक डॉ. संतोष उमाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पशुधन योजनेची सविस्तर माहिती देताना क्लस्टर पद्धतीने व सहकाराच्या माध्यमातून योजना राबविल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असे नमूद केले. स्वयंसेवी संस्थांमार्फत आयोजित प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करत विविध कार्यकारी सहकारी संस्था, दूध संघ, अटल पणन संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी रवींद्र अमृतकर यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतीचा खर्च कमी करणाऱ्या उपाययोजना, सौरऊर्जेवरील लघु कोल्ड स्टोरेज, सोलर डिहायड्रेशन, मूल्यवर्धन आणि ग्रामीण उद्योजकता विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याची माहिती दिली. पशुधनवाढ आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करून शेतकऱ्यांना पूरक व शाश्वत उत्पन्न उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मागेल त्याला पशुधन योजनेचा लाभ मिळावा, तसेच समूहाच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय उभारणाऱ्या पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. केंद्र शासनाने पशुपालनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस नवी दिशा मिळाल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, कृषिभूषण समाधान पाटील, विकास दूध संघाचे शैलेश मोरखडे, तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास कोळी, माजी कृषी संचालक अनिल भोकरे यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्था, दूध संघ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने पशुपालक शेतकरी उपस्थित होते. तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामदास कोळी, अविनाश खडके, पंढरीनाथ इंगळे, गिरीश वराडे, समीर पाटील आणि विवेक सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास जळगाव जिल्हा पशुधन विकासात राज्यात आदर्श ठरू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



