Home क्राईम वराड येथील शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

वराड येथील शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

0
53

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वराड येथे ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या वसुलीचा तगादा, खाजगी आर्थिक व्यवहारांमधून झालेला कथित मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत फायनान्स एजंटसह तिघांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वराड येथील शेतकरी योगेश बबनराव भोसले यांनी काही वर्षांपूर्वी शेतीच्या कामासाठी कोटक महिंद्रा बँकेमार्फत फायनान्सवर ट्रॅक्टर खरेदी केला होता. ट्रॅक्टरचा एक हप्ता ५ जून २०२६ रोजी काहीसा उशिरा भरला गेल्याने फायनान्स एजंट करण कोळी याने त्यांना वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एक लाख रुपये घेऊन येण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, १३ जुलै रोजी निवृत्ती कोळी यांनी ट्रॅक्टरचा चौथा हप्ता भरल्याचे सांगत ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. ट्रॅक्टर जप्त झाल्यानंतर तसेच सातत्याने होत असलेल्या कथित धमक्यांमुळे योगेश भोसले हे तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.१६ जुलै २०२६ रोजी दुपारी योगेश भोसले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना त्यांच्या घरातून एक डायरी आणि रजिस्टर जप्त केले. या रजिस्टरमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये करण कोळी, नामदेव भोई आणि निवृत्ती कोळी यांच्या त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मृत शेतकऱ्याचा मुलगा प्रतीक योगेश भोसले (वय २१) याने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे करीत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर वाढत चाललेला आर्थिक ताण, कर्जवसुलीच्या पद्धती आणि कथित मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.


Protected Content

Play sound