जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील पिण्याचे पाणी, शेतीसाठी वापराचे पाणी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याशी संबंधित जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचा सखोल आढावा
या बैठकीत आमदार अमोल जावळे यांनी Water Use Efficiency (WUE), Cropping Intensity (पीक तीव्रता) आणि Water Application Efficiency (पाण्याचा वापर कार्यक्षमता) यांसारख्या तांत्रिक आणि महत्त्वाच्या विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास प्रवृत्त केले. विद्यमान कार्यपद्धतीतील त्रुटींवर प्रकाश टाकत, त्यांनी सुसंगत, प्रभावी, परिणामकारक आणि दीर्घकालीन नियोजनाच्या गरजेवर भर दिला. भूजल साठा वाढवणे, सिंचनाची कार्यक्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध करून देणे या दृष्टीने तात्काळ उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “जनतेच्या पाण्याच्या गरजा हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. प्रत्येक नागरिक व शेतकऱ्याला वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार जावळे यांनी बैठकीच्या शेवटी स्पष्ट केले.
नगरपरिषद क्षेत्रातील विकासकामांचा आढावा
यावल, रावेर आणि फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित तसेच चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर सखोल चर्चा झाली. मंजूर निधीची त्वरित अंमलबजावणी, नागरी सेवांमध्ये गुणवत्ता राखणे, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई तसेच मान्सूनपूर्व नालेसफाईसंबंधी आमदार अमोल जावळे यांनी स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले. “शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये ठोस समन्वय आवश्यक आहे. नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही,” असे आमदार जावळे यांनी नमूद केले.
पिकांवरील रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाची महत्त्वपूर्ण बैठक
जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पिकांवर वाढत चाललेल्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी कृषी विभागाची आढावा बैठकही आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बुरशीजन्य, विषाणूजन्य व इतर रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी वेळेवर फवारणी करणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि आवश्यक कीटकनाशक व औषधांचे वेळेवर वितरण सुनिश्चित करणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय, रोगग्रस्त शेती क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करत शेतकऱ्यांच्या हितासाठी एक प्रभावी कृती आराखडा तयार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या महत्त्वपूर्ण बैठकांना यशवंतराव भदाणे (अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग), गोकुळ महाजन व जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंते, सौरभ जोशी (सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन), तसेच यावलचे मुख्याधिकारी निशिकांत गवई, रावेरचे अभिजित कदम, फैजपूरचे भूषण वर्मा, कृषी विभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन शाखेचे अधिकारी उपस्थित होते.