Home क्राईम बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले !

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एसटी बसस्थानकांवरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचा प्रत्यय जळगाव शहरात आला आहे. जळगाव शहरातील नवीन बस स्टँड परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने अत्यंत चाणाक्षपणे चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमन कौतीक पाटील (वय ७०, रा.वर्डी, ता.चोपडा) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमन पाटील यांच्यासह काही कामानिमित्त जळगाव शहरात आले होते. २२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन बसस्थानक प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत एका अज्ञात चोरट्याने यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी घेतलेली, ९ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी, मंगळसूत्र आणि सोन्याचे पदक असलेली पोत अतिशय शिताफीने चोरून नेली. या चोरीला गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत ३० हजार इतकी आहे.

बस स्थानकावरून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील सोन्याची पोत गायब झाल्याचे यमुनाबाई यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही दागिने न मिळाल्याने अखेर त्यांनी पतीसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound