
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात पावसाळा तोंडावर आलेला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईच्या कामांना वेग दिला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत अडचणीचा आणि गजबजलेला मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी, २४ मे रोजी आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या धडक मोहिमेत नाल्यातून सुमारे तीन ट्रॅक्टर इतका साचलेला गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

नागरिकांच्या तक्रारीची महापौरांकडून दखल :
प्रभाग क्रमांक १५ मधील बाबा खोली नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्याने येथे साफसफाई करण्यासाठी यंत्रसामग्री नेण्यास अजिबात जागा शिल्लक नव्हती. आगामी पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात घाणेरडे पाणी शिरण्याची भीती असल्याने, त्रस्त स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत धाव घेत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाला या नाल्याची विशेष मोहीम राबवून साफसफाई करण्याचे कडक आदेश दिले होते.
६ तास चालली धडक मोहीम :
महापौरांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने रविवारी सकाळी ७ वाजेपासूनच या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. अत्यंत बिकट परिस्थिती आणि जागेची प्रचंड अडचण असतानाही, कर्मचाऱ्यांनी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सलग काम केले. या मोहिमेत सुमारे १ किलोमीटर लांबीच्या या मोठ्या गटारीमधील साचलेला संपूर्ण गाळ आणि कचरा उपसण्यात आला.
महापौरांची प्रत्यक्ष पाहणी
स्वच्छतेचे हे काम सुरू असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी बाबा खोली परिसरात भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही दिवसांनी पुन्हा एकदा या नाल्याची साफसफाई केली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी (BVG) कंपनीचे ठेकेदार आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



