Home Cities जळगाव जळगावात २८ मे रोजी साजरी होणार बकरीद !

जळगावात २८ मे रोजी साजरी होणार बकरीद !


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चंद्रदर्शन एक दिवस उशिरा झाल्यामुळे यंदाची ईद-उल-अजहा (बकरा ईद) आता २७ मे ऐवजी गुरुवार, २८ मे २०२६ रोजी देशभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जळगाव शहरातही ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नमाजाची तयारी पूर्ण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-उल-अजहाची विशेष नमाज गुरुवार, २८ मे रोजी सकाळी ठीक ८ वाजता सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे अदा करण्यात येणार आहे. मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण होणार असून सर्व नमाजी बांधवांनी वेळेवर ईदगाह मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली यांच्यासह मौलाना नजमूल हक, इकबाल वजीर, मुख्तार शाह, मौलाना खलील बरकाती आणि रशीद कुरेशी यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत शांतता व सौहार्द जपण्याचे आवाहन केले आहे.

तसेच ईद-उल-अजहानिमित्त कुरबानी करताना सर्वांनी विशेष काळजी घ्यावी, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि शासनाने परवानगी दिलेल्या पशूंचीच कुरबानी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छतेची जबाबदारी लक्षात घेऊन वेस्ट मटेरियल महानगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि पुरेशा पाण्याचा वापर करावा, असेही आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर जळगावात धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक सलोखा आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात येत असून मुस्लिम समाजात सणाच्या तयारीला वेग आला आहे.


Protected Content

Play sound