फैजपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीत ‘वाघुळदे दाम्पत्य’ सज्ज 


सावदा/फैजपूर –जितेंद्र कुलकर्णी । फैजपूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला असून, विविध दावे, उमेदवारीची तयारी आणि चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर समाजसेवेच्या बळावर फैजपूरकरांच्या मनात आपली खास ओळख निर्माण करणारे श्री. सिद्धेश्वर वाघुळदे आणि त्यांच्या पत्नी सौ. धनश्री सिद्धेश्वर वाघुळदे हे दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहे.

सिद्धेश्वर वाघुळदे हे गेल्या अनेक वर्षांपासून फैजपूर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी सुरू केलेली ॲम्बुलन्स सेवा, गरजूंसाठी वैद्यकीय मदत, तसेच स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपक्रम त्यांच्या सामाजिक भानाची साक्ष देतात. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे ते फैजपूरमध्ये एक आदर्श कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.

यंदा फैजपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला प्रवर्गात आरक्षण असल्याने सौ. धनश्री वाघुळदे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्याचवेळी, सिद्धेश्वर वाघुळदे स्वतः नगरसेवक पदासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विकासाची दृष्टी, पारदर्शक प्रशासनाची बांधिलकी आणि नागरिकांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद देण्याची भावना हे या दाम्पत्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

“सेवा हाच धर्म आणि विकास हाच ध्यास” या तत्त्वावर काम करणारे वाघुळदे दाम्पत्य त्यांच्या सशक्त सामाजिक पृष्ठभूमीच्या जोरावर जनतेसमोर नव्याने उभे राहत आहेत. स्थानिकांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेली तत्काळ मदत, घराघरात पोहोचलेली त्यांची सेवा आणि प्रत्येक स्तरातील नागरिकांशी जपलेला संपर्क ही त्यांची निवडणुकीतील प्रमुख ताकद ठरत आहे.

फैजपूरमध्ये या दाम्पत्याच्या उमेदवारीने राजकीय समीकरणांमध्येही हालचाल होऊ लागली आहे. स्थानिक स्तरावर विविध राजकीय गटांमध्ये चर्चेला उधाण आले असून, अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याची खुलेआम प्रशंसा केली आहे.