
जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या दोन प्रमुख दिवाळी सणांनिमित्त ओपीडी बंद ठेवण्यात येणार असून, इतर दिवशी नियमित सेवा सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार (२० ऑक्टोबर ) रोजी ओपीडी नियमित सुरू राहील. त्यानंतर मंगळवारी ( २१ ऑक्टोबर) रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ओपीडी बंद राहील. त्याचप्रमाणे, बुधवारी ( २२ ऑक्टोबर ) ओपीडी पुन्हा सुरू राहील, तर गुरुवारी (२३ ऑक्टोबर )भाऊबीज निमित्त रुग्णसेवा बंद ठेवण्यात येईल.
तथापि, वैद्यकीय सेवा सलग बंद ठेवता येत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने हा संतुलित वेळापत्रक ठरवला आहे. त्यामुळे आपत्कालीन व आवश्यक आरोग्य सेवा सुरू राहतील, तर ओपीडी सेवा नमूद केलेल्या तारखांनुसार बंद अथवा सुरू राहतील.
शुक्रवार (२४ ऑक्टोबर )पासून बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळापत्रकानुसार पूर्ववत सुरू होईल. रुग्ण, नातेवाईक व संबंधित कर्मचाऱ्यांनी या बदलाची नोंद घेऊन नियोजन करावे, असे आवाहन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त आरोग्यसेवा व्यवस्थेतील सुट्यांमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



