
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित जैन चषक राज्य मानांकन प्रौढ टेबल टेनिस स्पर्धेत जळगावचे विवेक आळवणी यांनी एकेरी आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर मोठा आनंद व्यक्त होत आहे.
मु. जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल इंडोअर हॉलमध्ये सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ६० आणि ६५ वर्षांवरील गटांतील सामने खेळविण्यात आले. ६० वर्षांवरील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत विवेक आळवणी यांनी पुण्याच्या पराग जुवेकर यांचा ११/८, ११/९, ११/७ असा सरळ सेट्समध्ये पराभव करत सहज विजय संपादन केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
याच स्पर्धेतील सांघिक प्रकारातही विवेक आळवणी यांनी आपली छाप पाडत अनिल निंबाळकर, पराग जुवेकर आणि सुभाष गुजराती या सहकाऱ्यांसह ‘डेक्कन स्मॅशर्स’ संघाला विजेतेपद मिळवून दिले. या विजयात आळवणी यांची कामगिरी निर्णायक ठरली.
६५ वर्षांवरील गटात मुंबई उपनगरचे जयंत कुलकर्णी यांनी अंतिम फेरीत नाशिकच्या उमेश कुंबोजकर यांना ११/८, ११/९, ९/११, १२/१४, ११/९ अशा पाच सेट्सच्या चुरशीच्या सामन्यात पराभूत करत विजेतेपद प्राप्त केले.
विशेष म्हणजे, काल ८० वर्षांवरील गटात पुण्याचे ८५ वर्षीय खेळाडू सुबोध देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले होते, तर आज त्यांचे सख्खे भाचे विवेक आळवणी यांनी विजेतेपद जिंकले. त्यामुळे मामा-भाच्याच्या या दुहेरी यशाची चर्चा संपूर्ण क्रीडा वर्तुळात सुरू आहे.
स्पर्धेतील विजयी व उपविजयी खेळाडूंना बक्षिसे शोभनाभाभी जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी, ज्येष्ठ टेबल टेनिसपटू सुबोध देशपांडे, असोसिएशनचे डॉ. हर्षद त्रिपाठी आणि आर. सी. शहा यांची उपस्थिती होती.
ही स्पर्धा जैन इरिगेशन लिमिटेडच्या प्रायोजकत्वाखाली पार पडत असून, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विवेक आळवणी यांचे हे यश नवोदित खेळाड्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



