Home क्राईम सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची ८ वाहनांवर कारवाई ; ५५ लाखांची वाहने जप्त

सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची ८ वाहनांवर कारवाई ; ५५ लाखांची वाहने जप्त


 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत वाळू माफियांना जबर दणका दिला आहे. जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे विशेष मोहीम राबवत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धाड टाकून ८ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत ५५ लाख रुपये किमतीची वाहने आणि ४२ हजार रुपये किमतीची अवैध वाळू जप्त करण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल रोजी ४ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २५ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा एकाचवेळी संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत धरणगाव, जळगाव तालुका आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान बीएनएस २०२३ च्या कलम ३०३ (२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३० (१) आणि १७७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण आठ वाहने ताब्यात घेतली असून त्यामध्ये ट्रॅक्टर आणि डंपरचा समावेश आहे. या कारवाईत ५५ लाख रुपये किमतीची वाहने आणि ४२ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे.

धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक डंपर जप्त करण्यात आला असून जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ट्रॅक्टरवर कारवाई झाली. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कारवाई करत तीन डंपर जप्त करण्यात आले. या संयुक्त कारवाईमुळे जिल्हाभरातील अवैध वाळू उपसा साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध खनिज संपत्ती चोरीविरोधात कठोर भूमिका घेत कायद्याचा प्रभावी वापर सुरू ठेवला असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले. पोलीस प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया निरंतर सुरू राहतील, असा इशारा देत वाळू माफियांना स्पष्ट संदेश दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेली ही मोहीम प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.


Protected Content

Play sound