निखिल भाऊ खडसे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत दमदार यश!


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुऱ्हा येथील शिवाजी हायस्कूल येथे अलीकडेच पार पडलेल्या तालुकास्तरीय वयोगट १४ व १७ आतील मैदानी क्रीडा स्पर्धेत मुक्ताईनगरच्या स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी सादर करत तालुकास्तरावर शाळेचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.

या स्पर्धेत इयत्ता आठवीतील कु. अंकिता सतीश सावळे आणि कु. ममता सतीश सावळे (दोघीही राहणारे वढवे) या भगिनींनी भालाफेक (जॅव्हेलिन थ्रो) स्पर्धेत विशेष कौशल्य दाखवत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या जोडीतील दमदार कामगिरीमुळे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले आहे.

इयत्ता दहावीतील कांचन पुंजाजी नेमाडे याने गोळाफेक (शॉट पुट) या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या सरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात दाखवलेले कौशल्य व मेहनत खरोखरच प्रशंसनीय आहे.

या यशामागे शाळेच्या क्रीडा समन्वयक पुनम बोदडे मॅडम यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्याने सराव करत हे यश संपादन केले. शाळेचे संस्थाध्यक्ष रमेश महादू खाचणे, सचिव मा. श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार), मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर, सर्व संचालक मंडळ, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शाळेत आणि परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.