
फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “बुद्धिमान आणि संस्कारशील युवक हीच देशाची खरी संपत्ती आहे. शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करणे हे आपल्या सर्वांचे सामाजिक दायित्व आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट (फैजपूर) आणि नोबेल फाउंडेशन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’च्या प्रवेश परीक्षेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, JEE आणि NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य प्रशिक्षण, तसेच निवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांत प्रवेश परीक्षा घेण्यात आली, ज्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्प हा जळगावसाठी एक दिशादर्शक प्रकल्प आहे आणि या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेवक नरेंद्र पाटील आणि ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित युवकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत प्रेरणा दिली.
नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी प्रास्ताविक करताना या शिष्यवृत्ती महाअभियानाची पार्श्वभूमी आणि पुढील उद्दिष्टे स्पष्ट केली. धर्म आणि शिक्षणाची सांगड घालून राष्ट्रसेवा करणारा युवक घडवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खानदेश स्तरीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, अक्षय देवरे, विवेक साळुंखे, तुषार पाटील आणि प्रशांत तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



