जळगाव-विशेष प्रतिनिधी । सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या मनमानी कारभाराची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत पीएचा चार्ज काढला आहे. तथापि, त्यांची अकड कायम असून आता ते कर्मचाऱ्यांना दबावात घेत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांची दबंगगिरी आता खात्यात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. थेट अगदी मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांना न मानता सहकाऱ्यांना दबावात ठेवण्याची त्यांची कार्यप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याच दबंगगिरीतून त्यांनी प्रोजेक्ट इंजिनिअर अर्थात पी.ए. म्हणून पारोळा येथील उपअभियंत्याचा चार्ज असलेल्या उपअभियंत्याकडे सोपवून मनमानी कारभार सुरू केला होता. यामुळे त्यांच्या विरोधात अमळनेर विभागात मोठा उद्रेक झाला. याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजने वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत सुभाष राऊत कारभार करत असल्याची माहिती आम्ही या वृत्तातून परिणामकारक पध्दतीत मांडली होती. यामुळे अखेर राऊत यांनी पी.ए. पदाचा कार्यभार काढला आहे. मात्र हे करत असतांना आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा दबावात घेतले आहे. आपल्या उपअभियंत्यांना त्यांनी सूचक शब्दात इशारा दिला असून यामुळे विभागातील अस्वस्थता वाढली आहे.
सुभाष राऊत यांच्या मनमानी कारभारामुळे वरिष्ठ, सहकारी अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार आधीच त्रस्त झालेले असतांना त्यांनी पीएची नियुक्ती रद्द केली असली तरी सहकाऱ्यांना पुन्हा एकदा दबावात ठेवण्याची खेळी सुरू केली आहे. याला आळा घालण्याची मागणी सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे.



