सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सावदा नगरपालिकेत प्रथमच आदिवासी बांधवांच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली. नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांनी ही प्रतिमा स्वीकारत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या भावना आणि अस्मितेला नगरपालिका स्तरावर सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आदिवासी दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचा सन्मान राखत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.विशेष म्हणजे रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन नगराध्यक्षा रेणुका पाटील स्वतः नगरपालिका कार्यालयात उपस्थित राहिल्या. त्यांनी जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्वीकारून आदिवासी समाजाप्रती संवेदनशीलता आणि आदर व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेबद्दल नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांनी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांचे आभार मानले. जननायक बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी लढणारे महान क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रतिमेला सावदा नगरपालिका कार्यालयात स्थान मिळाल्याने आदिवासी समाजासाठी हा भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. नगरपालिका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेची स्थापना होणे हे आदिवासी समाजाच्या इतिहास, संघर्ष आणि योगदानाची दखल घेणारे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्यासमवेत नगरसेविका रेखा वानखेडे, कु. सिमरन वानखेडे, विशाल सोनवणे, सुनील जंगले आदी उपस्थित होते. तसेच नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अशरफ तडवी, नवाब तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेला सन्मान देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला नगरपालिका कार्यालयात कायमस्वरूपी स्थान मिळाल्याने समाजातील नव्या पिढीला त्यांच्या संघर्षाची आणि कार्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. सावदा नगरपालिकेत आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट स्वीकारून नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी आदिवासी समाजाच्या भावना आणि अस्मितेला सन्मान दिला. या उपक्रमामुळे नगरपालिका आणि आदिवासी समाजातील संवाद व सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.



