कानपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे कसोटी सामना खेळला जात आहे. आज ३० सप्टेंबर रोजी सामन्याचा चौथ्या दिवशी टीम इंडियाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याला एका खास विक्रमात मागे टाकले. वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करणारा विराट कोहली जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने ३५ धावा करताच हा आकडा गाठला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्य यादीत कोहलीच्या पुढे आता फक्त रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर हेच आहेत. कानपूर कसोटीत फलंदाजी करण्यापूर्वी कोहलीने ५९३ डावात २६,९६५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ३५ चेंडूत ४७ धावा केल्या, मात्र तो शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. २००७ साली सचिनने कारकिर्दीतील ६२३ व्या इनिंगमध्ये २७ हजार धावांचा आकडा पार केला होता. मात्र कोहलीने त्याच्यापेक्षा २९ डाव कमी खेळून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुसरीकडे, संगकाराने २७ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ६४८ डाव खेळले होते, तर पाँटिंगने आपल्या ६५० व्या डावात इतक्या धावा पूर्ण केल्या होत्या.