दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रयागराज येथे पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष ९९२ रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून येणा-या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वेस्थानकांसह विविध रेल्वेशी निगडित विविध ठिकाणांच्या नूतनीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ९९३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या वतीने प्रयागराज विभाग आणि आसपासच्या विभागातील रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण देखील वेगात सुरू आहे. यासाठी सुमारे ३ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रयागराज येथे १२ जानेवारी पासून सुरू होणा-या कुंभमेळ्यासाठी सुमारे ३० कोटी ते ५० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. विशेष ९९२ रेल्वे गाड्यांसह विविध शहरातून नियमित येणा-या सहा हजार ५८० रेल्वे गाड्यांची वाहतूक देखील सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना आखली जात आहे. त्याचप्रमाणे गरज पडल्यास येथील रेल्वेची संख्या आणखीही वाढविण्यात येईल असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.