यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील प्रत्येक गावात बँकेची ओळख निर्माण व्हावी या हेतूने ‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा शाखेने डोंगर कठोरा येथून अभियानाची सुरुवात केली. ५ जुलै, शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच नवाज तडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल गीते (कृषी विभाग, बँक ऑफ बडोदा जळगाव), ऋषिकेश लाड (व्यावसायिक कर्ज विभाग, बँक ऑफ बडोदा जळगाव), राहुल शेगोकार (शाखाव्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा यावल), चंद्रकांत भिरूड (चेअरमन, विकास सोसायटी), विशाल इंगळे (कृषी विभाग अधिकारी, यावल) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रामपंचायत व विकास सोसायटी सदस्य कल्पना राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भिरूड यांनी मानले. कार्यक्रमात बोलताना शाखाव्यवस्थापक राहुल शेगोकार यांनी बँकेची कार्यपद्धती, खाते उघडण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे यासंदर्भात माहिती दिली. त्याचप्रमाणे ‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले.
राहुल गीते यांनी शेतकरी आणि महिलांसाठी असलेल्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी व्यावसायिक कर्ज, पीक कर्ज, महिला बचत गटांसाठी योजना, शासकीय अनुदान आणि विविध कर्ज उपक्रम यावर प्रकाश टाकला. गावकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आपले प्रश्न विचारले आणि त्यांना त्वरित मार्गदर्शन मिळाले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विकास सोसायटी डोंगर कठोरा, बँक ऑफ बडोदा यावल शाखा तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अशोक तायडे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमात गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता, तसेच पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.