मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास चव्हाण तर तालुकाध्यक्षपदी संतोष शेलोडे


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांच्या न्याय आणि हक्कांसाठी कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार, २३ जून रोजी पुण्यात ‘नेशन फर्स्ट’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. सिम्बायोसिस सभागृहात आयोजित या सोहळ्यात संघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, ज्यात जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात विकास प्रभाकर चव्हाण यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी, संतोष शेलोडे यांची भुसावळ तालुकाध्यक्षपदी, तर मनोज निळे यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले.

मराठी पत्रकार संघ हा केवळ पत्रकारांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच सक्रिय असतो. ‘नेशन फर्स्ट’ हा कार्यक्रम याच सामाजिक बांधिलकीचा भाग होता. या प्रसंगी केंद्रीय रस्ते-वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, सुनील माळी, भावेश शिंगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशासाठी युद्धात अवयव गमावलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला, तसेच पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनाही सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील या नव्या नियुक्त्यांमुळे मराठी पत्रकार संघाचे कार्य जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे विस्तारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.