जळगावातून वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांना दिलासा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी आषाढी एकादशी (२०२५) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या आणि परत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि तेथून परत येणाऱ्या हलक्या व जड वाहनांना पथ करातून (टोल) सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीचा आणि कमी खर्चात होणार आहे.

सवलत प्रवेशपत्रासाठी विशेष कक्ष
या टोल सवलतीचा लाभ घेण्यासाठी वारकऱ्यांना विहीत नमुन्यात सवलत प्रवेशपत्र मिळवणे आवश्यक आहे. हे प्रवेशपत्र देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दररोज सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. याच वेळेत प्रवेशपत्र जारी करण्याचे काम केले जाईल.

वेळेत प्रवेशपत्र मिळवण्याचे आवाहन
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी सर्व भाविक आणि वाहनचालकांना याची नोंद घेऊन, वेळेत संबंधित विशेष कक्षातून आवश्यक असलेले प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे वारीदरम्यान टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि वेळ वाचण्यास मदत होईल, तसेच वारकऱ्यांना सुलभ प्रवास करता येईल.